Thursday, 16 February 2012

पाणी टंचाईचे संकट

 बोधेगाव। दि. १६ (;वार्ताहर)-
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पस्तीस गावांमधील विहिरींनी तळ गाठला असून भू-जल पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे या गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव परिसर नेहमी दुष्काळी पट्टय़ात येत असल्याने पर्यन्यमानही जेमतेम असते. चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहीर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. थोड्याफार पाण्यावर जनावरांसाठी मका, घास, गवत शेतकर्‍यांनी घेतले. परंतु 'महावितरण' च्या असहकाराच्या धोरणामुळे खंडित होणार्‍या वीज पुरवठय़ामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
लाडजळगाव, शेकटे, लमाणतांडा, चिकणी तांडा, नागलवाडी, गोळेगाव या भागात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पिकांना पाण्याच्या पाळय़ाही जास्त द्याव्या लागत असून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.
ऊस पिकाच्या फुटण्यावर मध्यंतरीच्या थंडीचा परिणाम झाला आहे. कोम फुटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ठिबक सिंचनावर पिके घेणार्‍या शेतकर्‍यापुढे विजेची समस्या असल्याने पीक धोक्यात आले आहे. परिसरातील उसाचे क्षेत्र संपल्याने साखर कारखान्याचा गळीत हंगामही लवकर आटोपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोधेगाव भागात सध्या चार्‍याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. आठवडेबाजारात कडब्याची पेंढी पंधरा रुपयास तर घास, मका या हिरव्या चार्‍याचा भावही गगनाला भिडला आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या उसाचा वापर जनावरांना चारा म्हणून शेतकरी करीत आहेत. गुंठय़ाचा भाव अडीच ते तीन हजारापर्यंत गेला आहे.
शेततळे कोरडे
कोट्यावधी रुपयांचे अनुदान देऊन बोधेगाव परिसरात सुमारे दोनशे ते तीनशे शेततळी झाली. परंतु यंदा कमी पाऊस झाल्याने ती कोरडी आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे अनुदान मातीत गेले आहे. वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करुन मध्यवर्ती ठिकाणी चाराडेपो सुरु करावे लागतील, अशी परिस्थिती आहे.