Friday, 20 January 2012

पस्तीस गावांवर विजेचे संकट
बोधेगाव दि.१९ (वार्ताहर)
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पस्तीस गावांमध्ये वीज प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे जळाल्याने ऐन हंगामात पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत.
'महावितरण'च्या बालमटाकळी उपकेंद्रातील पस्तीस गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे महिन्यापासून विजेच्या कमी-अधिक दाबामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ऐन हंगामातील ज्वारी, ऊस, हरभरा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत.
याबाबत या भागातील शेतकर्‍यांनी 'महावितरण'शी संपर्क केला असता रोहित्रावरील थकबाकी भरलेली बिले दाखवा, त्यानंतरच नवीन रोहित्राची शिफारस आपण वरिष्ठांकडे करु, असे उत्तर मिळते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. थकबाकी भरण्यासाठी शेतकर्‍यांकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नाही. भावाअभावी कापूस घरात पडून आहे. कापसाचे उत्पादनही यंदा निम्म्याने घटल्याने हातात पैसा नाही. त्यामुळे बिलासाठी पैसे कोठून आणायचे ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी गहू, हरभरा तसेच नवीन ऊस लागवडही धोक्यात आली आहे. वीज नसल्याने शेतकर्‍यांना जनरेटरची मदत घ्यावी लागते. जनरेटरचा खर्च करुनही काही शेतकरी वैतागले आहेत. या भागातील रोहित्रांचा अहवाल 'महावितरण' ने तातडीने नगरला मुख्य कार्यालयाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment