Sunday, 27 November 2011

बोधेगाव अवैध धंद्याच्या विळख्यात
गुन्हेगारीच्या
प्रमाणात वाढ
बोधेगाव। दि. २७ [गणपत दसपुते]
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसर सध्या अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
अधोडी व बालमटाकळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात टेम्पोभर देशी, विदेशी दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला. हा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू होता. बालमटाकळी येथे आढळलेल्या रिकाम्या बाटल्या, लेबल, झाकणे यावरुन बनावट दारु तयार करण्याचा व्यवसाय सुरु होता, असे प्रथमदर्शनी दिसते. या परिसरात पूर्वी पोत्यांनी गांजा सापडला होता. गेल्या महिन्यात जुगार अड्डय़ावर छापा टाकून मटकाकिंगला पकडण्यात आले होते. हे सर्व अवैध धंदे मराठवाड्याची सरहद्द बोधेगावपासून दहा कि. मी. अंतरावर असल्याने ते फोफावले आहेत. या भागातील माल मराठवाड्यात तर मराठवाड्यातील दारु, गांजा गावात विकण्याचे नेटवर्क वाढत आहेत. ुकमी पोलिस बळाचा फायदा हे तस्कर घेत असून त्यांचे मोबाईलचे नेटवर्क कारणीभूत आहे. या अवैध धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी
होत आहे. गुन्हेगारीच्या
प्रमाणात वाढ
बोधेगाव येथील युवकांचे पोलिस दादांचे स्वप्न अखेर साकार [छाया -अन्वर मणियार ]
बोधेगाव। दि.२७ (गणपत दसपुते)
पोलिस भरतीची जाहिरात येण्यापूर्वी वर्षापासून खेळाच्या मैदानात भरतीची तयारी करणार्‍या बोधेगाव येथील आठ युवकांचे स्वप्न अखेर साकार झाले.
दुष्काळी पट्टय़ात असलेल्या या भागात शेती, मजुरीशिवाय सुविधा नसल्याने या युवकांनी शारीरिक व अभ्यासाची तयारी केली. नगर येथे नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत ते दाखल झाले आणि त्यांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार झाले. बोधेगाव ग्रामस्थांनी बन्नो माँ दर्गा येथे भरतीमध्ये निवड झालेले संदीप गर्जे, विनोद मासाळकर, वैभव खिळे, याकूब सय्यद, अकबर पठाण, आप्पासाहेब वैद्य, ज्ञानदेव इलग, अमोल आंधळे यांचा जि. प. सदस्य प्रकाश भोसले, राम केसभट, ग्रा.पं. सदस्य कुंडलिक घोरतळे, वसंतराव दसपुते, आस्मान घोरतळे यांनी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार केला. प्रामाणिक नोकरी करुन भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, अशी ग्वाही या युवकांनी दिली. या सत्कारप्रसंगी पालकांच्या चेहर्‍यावर आनंदाश्रु दिसत होते.

Saturday, 26 November 2011

अधोडी, बालमटाकळीत दारुसाठापकडला     [छाया -अन्वर मणियार ]

बोधेगाव[गणपत दसपुते]- बोधेगाव परिसरातील अधोडी फाटा व बालमटाकळी येथील छाप्यात परराज्यातील दारुसाठा, बनावट दारु तयार करण्याचे साहित्य, टाटा सुमो असा सुमारे बारा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. नगर येथील उत्पादन शुल्क विभागाला खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन बोधेगाव-पाथर्डी मार्गावरील अधोडी फाट्यावरील एका घरातून १९४ बॉक्स परराज्यातील दारु जप्त केली. हॉटेल चालक अंबादास पोटभरे यास अटक करण्यात आली. तसेच शेवगाव-गेवराई मार्गावरील बालमटाकळी येथील आसाराज छाजेड यांच्या गाळय़ात सहा बॉक्स दारु, तीन पोती दारुच्या बाटलीचे झाकण व लेबल आढळून आले. या पथकाने या गाळय़ाला सील केले आहे. अधोडी येथे पकडलेल्या दारु बॉक्सवर दमण येथील लेबल आहे. तसेच बालमटाकळी येथे बिअर, देशी दारुच्या बाटल्यांची रिकामी झाकणे आढळून आली. गांजा तस्करीत छाजेड याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. नगर येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Monday, 14 November 2011

बोधेगाव परिसरात ३५ गावांत बालग्रामसभा
बोधेगाव। दि. १४ (गणपत दसपुते)
बालदिनाचे औचित्य साधून बोधेगाव जि. प. शाळेत बालग्रामसभा घेण्यात आली. बोधेगाव परिसरातील ३५ गावांमध्ये या बालग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यात आमच्या शाळेला संरक्षक भिंत द्या, शाळेसमोरील कचर्‍याची विल्हेवाट लावा, शाळेला अवांतर वाचनाची पुस्तके द्या, अशा समस्या मांडण्यात आल्या. तसेच त्या सोडविण्यासाठी विविध ठरावही करण्यात आले. बोधेगावचे सरपंच राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांमधून या सभेचा अध्यक्ष व सचिव सभासद निवड करून ही सभा घेण्यात आली. त्यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी सरपंच अंधारे व उपसरपंच भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सु. वि. शिंदे, भा. त्रि. घुले यांनी दिली. या बालग्रामसभेला ग. वि. दसपुते, क. म. पोटभरे, म. शि. मांदळे, सुर्यवंशी, पाटील, गर्कळ, बडे, कुबडे, शेलार केंद्रप्रमुख निर्मला जाधव उपस्थित होते. परिसरातील ३५ गावांत बालग्रामसभा झाल्या. बालकांचे हक्क, कर्तव्ये समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून बोधेगाव जि.प. शाळेत बालग्रामसभा घेण्यात आली. त्यात वेगवेगळे ठराव करण्यात आले.

Monday, 7 November 2011

भावात तडजोड करा मुंडेंचा शेतकरी संघटनेला सल्ला; दराच्या घोषणेला मात्र बगल!
(08-11-2011 : 01:44:48)   Share
बोधेगाव येथील केदारेश्‍वर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार गोपीनाथ मुंडे.
बोधेगाव। दि.७ (गणपत दसपुते)
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांच्या उसाला योग्य भाव देता येत नाही, असा आरोप करीत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी संघटनेला दराबाबत तडजोडीचा सल्ला दिला. मात्र, स्वत:च्या कारखान्याबाबत ऊसदर जाहीर करण्याचे खुबीने टाळले. त्यामुळे ऊसउत्पादकांचा भ्रमनिरास झाला.
वैद्यनाथ-केदारेश्‍वर साखर कारखान्याच्या दुसर्‍या गळिताचा प्रारंभ खासदार मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केदारेश्‍वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे हे होते.
राज्यातील साखर कारखान्यांनी ेसाडेचौदाशेवर भाव दिल्यास कारवाईचा इशारा खुद्द अजित पवारांनी दिला आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.
ते म्हणाले की, साखर उद्योगाबद्दल सरकारचे उदासीन धोरण जबाबदार आहे. या हंगामात मंत्री शरद पवार, विलासराव देशमुख, पतंगराव कदम यांनी त्यांच्या स्वत:च्या कारखान्यात मोळ्या टाकल्या. परंतु भाव जाहीर केला नाही. त्यामुळे मीही माझ्या ताब्यातील कारखान्याचा भाव जाहीर केला नाही, असे सांगून ऊसभावाबाबत मिठाची गुळणी धरली.
साखर कारखाना व शेतकरी संघटनांनी ऊस भावाबाबत तडजोड करावी. त्यासाठी मध्यस्थी करण्याची माझी तयारी आहे. चालू हिवाळी अधिवेशनात मी शेतकर्‍यांच्या बाजूने संसेदत उसाला जादा भाव देण्याबाबत आग्रही भूमिका घेणार आहे, असे मुंडे म्हणाले.
गेल्या वर्षी केदारेश्‍वर भागीदारीत घेताना राज्य सहकारी बँकेने उशिरा परवाना दिला. त्यामुळे सव्वादोन लाखांचे गाळप झाले. १ हजार ७५0 रुपये टनामागे ऊसउत्पादकांना भाव दिला. उर्वरित हप्ता डिसेंबरमध्ये देणार आहे. सभासद शेतकर्‍यांना १0 किलो साखर देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी केदारेश्‍वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला आमदार राम शिंदे, बाळासाहेब आजबे, राजेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष काटे, बाळासाहेब कांबळे, गोपाळ शर्मा उपस्थित होते.
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर!
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर आहे. राज्यातील वर्षानुवर्षे बंद पडलेल्या अनेक कारखान्यांना ऊजिर्तावस्थेत आणले आहे. एक बंद कारखाना सुरू झाल्यास दहा हजार कामगारांना रोजगार मिळतो. सहकार ही मक्तेदारी नाही. मी ‘वैद्यनाथ’ यशस्वीपणे चालवून राज्यात आदर्श निर्माण केला, असे मुंडे म्हणाले.
दादांना काकांचीच रिटायरमेंट हवीय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना मुंडे म्हणाले की, ‘आधी काकांच्या वयाचा विचार करा. मला रिटायर होण्याचा सल्ला देऊ नका. तसेच दुसर्‍यांना शिव्या देण्याचे काम बंद करा; अन्यथा मलाही चांगल्या शिव्या येतात. अजित पवार हे अप्रत्यक्षपणे माझ्या माध्यमातून शरद पवार यांच्याच रिटायरमेंटची वाट पहात असल्याचा टोलाही त्यांनी मारला. [ छाया -अन्वर मणियार ]

Friday, 4 November 2011

विजेच्या लपंडावाने इंजिन कारागिरांना सुगीचे दिवस
[छाया-अन्वर मणियार]    बोधेगाव। दि. ३ (गणपत दसपुते )

परिसरातील ३५ गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांनी वैतागून ऑईल इंजिनचा पर्याय स्वीकारला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून त्यांची धडपड सुरू आहे.
सततच्या भारनियमनाला शेतकरी कंटाळले आहेत. वीजपंप बंद राहत असल्याने शेतकर्‍यांनी विहिरीवर ऑईल इंजिन बसवली आहेत. त्यासाठी भारतीय बनावटीच्या महागड्या ऑईल इंजिनऐवजी चायना इंजिनचा आधार मिळत आहे. परंतु या इंजिनचे सर्व भाग मजबूत नसून त्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ऑईल इंजिन कारागीरांकडे दुरुस्तीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
कपाशीसह इतर पिकाच्या खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांना उभ्या पिकांसाठी लागणार्‍या विहिरीतील पाणी कसे द्यावे असा प्रश्न उभा आहे. वारंवार खंडित होणार्‍या व कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे ऑईल इंजिन वरदान ठरत आहे.
स्वस्तातील चायना ऑईल इंजिन बारा हजार ते चौदा हजारापर्यंत मिळते. परंतु विहिरीवर पाणी बाहेर काढण्याची चाचणी घेतानाच त्यामध्ये मोठे बिघाड होतात. जास्त किंमतीचे इंजिन घेण्याची ऐपत नसल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.
चायनाच्या इंजिनमुळे कारागिरांना आले सुगीचे दिवस आले आहेत.
येथील कारागिराकडे दररोज वीस ते पंचवीस इंजिन दुरुस्तीसाठी येतात, असे कारागीर प्रताप परदेशी यांनी सांगितले.
शेतकर्‍यांनी चायना इंजिन न घेता भारतीय बनावटीचे इंजिन गट तयार करून घ्यावे. म्हणजे कमी खर्च होईल व इंजिन दुरुस्तीची कटकट राहणार नसल्याचे परदेशी म्हणाले. एका इंजिन दुरुस्तीला कमीत कमी पाचशे व जास्तीत जास्त अडीच हजार खर्च येतो. इंजिन दुरुस्तीलाही नंबर लागले आहेत.

Wednesday, 2 November 2011

चोरट्यांचा धुमाकूळ
बोधेगाव। दि. २ (गणपत दसपुते)
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोधेगावनजीकच्या लाडजळगाव येथे एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये पन्नास हजाराचा तर ठाकूरपिंपळगाव येथे झालेल्या चोरींच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
लाडजळगाव येथील शिवाजी तहकीक यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दोन हजार, हबीब शेख यांच्या घरातून पाच हजारांचा ऐवज तसेच रामभाऊ तहकिक यांच्याकडे सुमारे पन्नास हजाराचे सोने व चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
बोधेगावपासून पाच कि. मी. अंतरावरील शेवगाव-गेवराई राजमार्गावरील ठाकूरपिंपळगाव येथे नारायण धायतडक, केदारनाथ दहिफळे यांच्याकडे झालेल्या चोरींच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
बोधेगाव दूरक्षेत्रात पोलिस बळ कमी आहे. हे पोलिसांच्या पथ्यावर पडले आहे. सहाय्यक फौजदार वाघमोडे यांनी स्वेच्छानवृत्ती घेतल्याने ही जागा रिक्त आहे. मुख्यालयी पुरेसे पोलिस नसल्याने चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपसरपंच भाऊराव भोंगळे यांनी पोलिस बळ वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची मागणी केली.

Tuesday, 1 November 2011

आठ गावांच्या पाणी योजनेवरील गंडांतर टळले
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी बोधेगाव। दि.१( गणपत दसपुते)
गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या बोधेगावसह आठ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार चंद्रशेखर घुले यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्यामुळेच पाणीयोजनेवरील गंडांतर तूर्त टळले.
बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा थकबाकीचे कारण देत महावितरणने तोडला होता. याबाबत या पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीने आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेऊन शेवगाव-गेवराई मार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
याबाबत या भागाचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा अभियंत्यांना या योजनेची वस्तुस्थिती सांगितली. चालू बाकी भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याचे निश्‍चित केले. त्याचबरोबर सध्या एक लाखाचा धनादेश देऊन योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे ठरले. त्यानुसार पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष अंधारे यांनी एक लाखाचा धनादेश आज महावितरणच्या शेवगाव कार्यालयाकडे सुपूर्त केला. त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. गुरुवारपर्यंत आठही गावामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी येणार आहे. पाण्यासाठी ठिय्या
गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने संतप्त महिलांनी बोधेगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. अचानक आलेल्या या मोर्चामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ झाली. लवकरच पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.