Friday, 4 November 2011

विजेच्या लपंडावाने इंजिन कारागिरांना सुगीचे दिवस
[छाया-अन्वर मणियार]    बोधेगाव। दि. ३ (गणपत दसपुते )

परिसरातील ३५ गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांनी वैतागून ऑईल इंजिनचा पर्याय स्वीकारला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून त्यांची धडपड सुरू आहे.
सततच्या भारनियमनाला शेतकरी कंटाळले आहेत. वीजपंप बंद राहत असल्याने शेतकर्‍यांनी विहिरीवर ऑईल इंजिन बसवली आहेत. त्यासाठी भारतीय बनावटीच्या महागड्या ऑईल इंजिनऐवजी चायना इंजिनचा आधार मिळत आहे. परंतु या इंजिनचे सर्व भाग मजबूत नसून त्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ऑईल इंजिन कारागीरांकडे दुरुस्तीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
कपाशीसह इतर पिकाच्या खर्चाने मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांना उभ्या पिकांसाठी लागणार्‍या विहिरीतील पाणी कसे द्यावे असा प्रश्न उभा आहे. वारंवार खंडित होणार्‍या व कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे ऑईल इंजिन वरदान ठरत आहे.
स्वस्तातील चायना ऑईल इंजिन बारा हजार ते चौदा हजारापर्यंत मिळते. परंतु विहिरीवर पाणी बाहेर काढण्याची चाचणी घेतानाच त्यामध्ये मोठे बिघाड होतात. जास्त किंमतीचे इंजिन घेण्याची ऐपत नसल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.
चायनाच्या इंजिनमुळे कारागिरांना आले सुगीचे दिवस आले आहेत.
येथील कारागिराकडे दररोज वीस ते पंचवीस इंजिन दुरुस्तीसाठी येतात, असे कारागीर प्रताप परदेशी यांनी सांगितले.
शेतकर्‍यांनी चायना इंजिन न घेता भारतीय बनावटीचे इंजिन गट तयार करून घ्यावे. म्हणजे कमी खर्च होईल व इंजिन दुरुस्तीची कटकट राहणार नसल्याचे परदेशी म्हणाले. एका इंजिन दुरुस्तीला कमीत कमी पाचशे व जास्तीत जास्त अडीच हजार खर्च येतो. इंजिन दुरुस्तीलाही नंबर लागले आहेत.

No comments:

Post a Comment