भावात तडजोड करा मुंडेंचा शेतकरी संघटनेला सल्ला; दराच्या घोषणेला मात्र बगल!
(08-11-2011 : 01:44:48) Share
(08-11-2011 : 01:44:48) Share
बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार गोपीनाथ मुंडे. |
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळेच शेतकर्यांच्या उसाला योग्य भाव देता येत नाही, असा आरोप करीत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी संघटनेला दराबाबत तडजोडीचा सल्ला दिला. मात्र, स्वत:च्या कारखान्याबाबत ऊसदर जाहीर करण्याचे खुबीने टाळले. त्यामुळे ऊसउत्पादकांचा भ्रमनिरास झाला.
वैद्यनाथ-केदारेश्वर साखर कारखान्याच्या दुसर्या गळिताचा प्रारंभ खासदार मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे हे होते.
राज्यातील साखर कारखान्यांनी ेसाडेचौदाशेवर भाव दिल्यास कारवाईचा इशारा खुद्द अजित पवारांनी दिला आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.
ते म्हणाले की, साखर उद्योगाबद्दल सरकारचे उदासीन धोरण जबाबदार आहे. या हंगामात मंत्री शरद पवार, विलासराव देशमुख, पतंगराव कदम यांनी त्यांच्या स्वत:च्या कारखान्यात मोळ्या टाकल्या. परंतु भाव जाहीर केला नाही. त्यामुळे मीही माझ्या ताब्यातील कारखान्याचा भाव जाहीर केला नाही, असे सांगून ऊसभावाबाबत मिठाची गुळणी धरली.
साखर कारखाना व शेतकरी संघटनांनी ऊस भावाबाबत तडजोड करावी. त्यासाठी मध्यस्थी करण्याची माझी तयारी आहे. चालू हिवाळी अधिवेशनात मी शेतकर्यांच्या बाजूने संसेदत उसाला जादा भाव देण्याबाबत आग्रही भूमिका घेणार आहे, असे मुंडे म्हणाले.
गेल्या वर्षी केदारेश्वर भागीदारीत घेताना राज्य सहकारी बँकेने उशिरा परवाना दिला. त्यामुळे सव्वादोन लाखांचे गाळप झाले. १ हजार ७५0 रुपये टनामागे ऊसउत्पादकांना भाव दिला. उर्वरित हप्ता डिसेंबरमध्ये देणार आहे. सभासद शेतकर्यांना १0 किलो साखर देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला आमदार राम शिंदे, बाळासाहेब आजबे, राजेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष काटे, बाळासाहेब कांबळे, गोपाळ शर्मा उपस्थित होते.
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर!
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर आहे. राज्यातील वर्षानुवर्षे बंद पडलेल्या अनेक कारखान्यांना ऊजिर्तावस्थेत आणले आहे. एक बंद कारखाना सुरू झाल्यास दहा हजार कामगारांना रोजगार मिळतो. सहकार ही मक्तेदारी नाही. मी ‘वैद्यनाथ’ यशस्वीपणे चालवून राज्यात आदर्श निर्माण केला, असे मुंडे म्हणाले.
दादांना काकांचीच रिटायरमेंट हवीय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना मुंडे म्हणाले की, ‘आधी काकांच्या वयाचा विचार करा. मला रिटायर होण्याचा सल्ला देऊ नका. तसेच दुसर्यांना शिव्या देण्याचे काम बंद करा; अन्यथा मलाही चांगल्या शिव्या येतात. अजित पवार हे अप्रत्यक्षपणे माझ्या माध्यमातून शरद पवार यांच्याच रिटायरमेंटची वाट पहात असल्याचा टोलाही त्यांनी मारला. [ छाया -अन्वर मणियार ]
No comments:
Post a Comment