Tuesday, 1 November 2011

आठ गावांच्या पाणी योजनेवरील गंडांतर टळले
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी बोधेगाव। दि.१( गणपत दसपुते)
गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या बोधेगावसह आठ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार चंद्रशेखर घुले यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्यामुळेच पाणीयोजनेवरील गंडांतर तूर्त टळले.
बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा थकबाकीचे कारण देत महावितरणने तोडला होता. याबाबत या पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीने आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेऊन शेवगाव-गेवराई मार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता.
याबाबत या भागाचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा अभियंत्यांना या योजनेची वस्तुस्थिती सांगितली. चालू बाकी भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याचे निश्‍चित केले. त्याचबरोबर सध्या एक लाखाचा धनादेश देऊन योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे ठरले. त्यानुसार पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष अंधारे यांनी एक लाखाचा धनादेश आज महावितरणच्या शेवगाव कार्यालयाकडे सुपूर्त केला. त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. गुरुवारपर्यंत आठही गावामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी येणार आहे. पाण्यासाठी ठिय्या
गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने संतप्त महिलांनी बोधेगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. अचानक आलेल्या या मोर्चामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ झाली. लवकरच पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.

No comments:

Post a Comment