Monday, 31 October 2011

बोधेगाव पाणी योजनेसाठी
उद्या आठ गावांचा रास्तारोको
बोधेगाव। दि. ३१ (गणपत दसपुते)
थकबाकीचे कारण देत महावितरण कंपनीने बोधेगावसह आठ गावांच्या पाणी पुरवठय़ाचा वीज पुरवठा खंडित केल्याने या पाणी वाटप संस्थेने महावितरणच्या विरोधात बुधवार (दि. २) रोजी शेवगाव-गेवराई राजमार्गावर रास्ता रोकोचा इशारा आज झालेल्या सरपंचांच्या बैठकीत दिला आहे.
गेल्या शनिवारी (दि. २९) रोजी महावितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने आज दि. ३१ रोजी या पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीची आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेतली.
त्यामध्ये रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला व वरिष्ठांना निवेदन पाठवले असून, त्यामध्ये या योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करून १५ दिवसांची मुदत, चालू बाकी भरण्यासाठी द्यावी व या योजनेचे जिल्हा परिषदेकडील थकलेले ९ लाख अनुदान प्राप्त झाल्यावर उर्वरित थकबाकी भरण्याची सवलत मिळावी असे म्हटले आहे.
दरम्यान, ही योजना सुरू झाल्याने बोधेगाव, बालमटाकळी, राणेगाव, शिंगोरी, दहिगाव-शे, अंतरवाली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव या गावांचे टँकर बंद झाले. परंतु या योजनेला अडसर आल्यास शासनाने पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणीही सरपंचाच्या बैठकीत करण्यात आली. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हास्तरीय संबंधित अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या पाणी योजनेच्या तोडगा बैठकीला बोधेगावचे सरपंच तथा अध्यक्ष राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच बापू बडे, बालमटाकळीचे सरपंच, तुषार वैद्य, अंतरवालीचे सरपंच एकनाथ कसाळ, शिंगोरीचे उपसरपंच प्रभाकर चेमटे, राणेगावचे सदस्य बाळासाहेब खेडकर, चापडगावचे सरपंच शिवाजी नेमाने उपस्थित होते                                                                            .[ छाया -अन्वर मणियार ]

No comments:

Post a Comment